Surabhi Jayashree Jagdish
पोटाचा कॅन्सर म्हणजे पोटाच्या आतील पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊन तयार होणारा गंभीर आजार असतो. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणं स्पष्ट दिसत नसल्यामुळे अनेकदा तो उशिरा लक्षात येतो.
हा कॅन्सर रूग्णाच्या शरीरात हळूहळू वाढत असल्यामुळे सुरुवातीला त्याची लक्षणं साध्या पोटदुखीसारखी वाटू शकतात. वेळेवर निदान न झाल्यास हा आजार शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतो. पोटाच्या कॅन्सरची नेमकी लक्षणं काय आहे ते जाणून घेऊया.
हा आजार प्रामुख्याने ५० वर्षांनंतर अधिक प्रमाणात दिसून येतो. मात्र चुकीची जीवनशैली, जंक फूड आणि धूम्रपानामुळे तरुणांमध्येही त्याचा धोका वाढताना दिसत आहे.
ताजं अन्न, फळं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास पोट निरोगी राहण्यास मदत होते. धूम्रपान, मद्यपान आणि जास्त मसालेदार किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणं आवश्यक असतं. सतत अॅसिडिटी, अपचन किंवा पोटदुखी होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
पोटाचा कॅन्सर असलेल्या अनेक लोकांना दीर्घकाळ अपचन किंवा अॅसिडिटीची समस्या जाणवू शकते. सुरुवातीला ही सामान्य पोटाची समस्या वाटत असल्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हा त्रास जर तुम्हाला वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
कमी खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटणं हे पोटाच्या कॅन्सरचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे व्यक्तीची भूक कमी होते आणि वजन हळूहळू घटू लागते.
कोणताही व्यायाम किंवा डाएट न करता वजन झपाट्याने कमी होणं याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू लागल्यामुळे शरीराची ऊर्जा वेगाने कमी होऊ शकते. अशा वेळी अशक्तपणा आणि थकवाही सतत जाणवू लागतो.
वारंवार मळमळ होणं, उलटी येणं किंवा उलटीत रक्त दिसणं ही धोकादायक लक्षणं असू शकतात. काही लोकांच्या शौचाचा रंग काळपट होतो. याचं कारण कारण आतून रक्तस्त्राव होत असू शकतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.