विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं आहे. भाजनेही सर्वाधिक 131 जागा जिंकत विक्रम केला आहे. लोकसभेला झालेली पिछेहाट विधानसभेला भरुन काढली आहे. विरोधकांनी चक्रव्यूह रचलं होतं. मात्र फडणवीसांनी ते भेदलं आहे. पाहूया एक रिपोर्ट....
लोकसभेला महायुतीची मोठी पिछेहाट झाली होती. ४८ पैकी केवळ १७ जागांवर यश मिळालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ही कसर भरुन काढली आहे. अभूतपूर्व यश मिळवलं आहे.
महाविकास आघाडीनं पक्षनिष्ठा, गद्दारी, कायदा व सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, शेतमालाचा भाव अशा अनेक मुद्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. संविधानाला धोका हा मुद्दाही लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही तापवला होता.
त्याशिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दाही होताच. विरोधकांचा सगळा प्रचार हा मुद्यांभोवती होता. मविआने महायुतीला अडकवण्यासाठी रचलेला सापळा आणि सगळी रणनिती या निकालानं फोल ठरवलेली आहे.
महायुतीच्या विजय़ाचे प्रमुख शिल्पकार देवेंद्र फडणवीस ठरले आहेत. विरोधकांचं चक्रव्यूह त्य़ांनी यशस्वीपणे भेदलं आहे. विरोधकांचं फेक नरेटिव्ह आम्ही धुडकाऊन लावलं असा निशाणा त्यांनी साधलाय.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत अशी टीका वारंवार संजय राऊत करत होते. तसंच बदलापूर अत्याचार आणि शिवपुतळा घटनेवरुनही फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून टीका झाली.
मराठा आंदोलक मनोज जरांगेही सातत्याने आरक्षणावरुन फडणवीसांना लक्ष करत होते. औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन, महाराष्ट्र द्रोही, शिवरायांचं राज्य ज्यांनी घालवलं त्या पेशव्यांचे उत्तराधिकारी असा उल्लेख फ़डणवीसांचा केला जायचा. मात्र टिकेचे हे सगळे बाण झेलून फडणवीसांनी विरोधकांचं चक्रव्यूह भेदलंय. हे वास्तव आहे.
सर्वप्रथम जागावाटपाचा तिढा खूबीनं सोडवला. महायुतीतले मतभेद वेळीच रोखले. त्यानंतर फडणवीसांनी प्रत्येक मतदारसंघात मायक्रो प्लानिंग केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक समीकरणानुसार त्यांनी रणनिती आखली. उमेदवार निवडीपासून ते विजयी करण्यासाठी पूर्ण रसद पुरवली.
निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा मास्टरस्ट्रोक दिला. ऐनवेळी शेतकरी कर्जमाफीचा वायदा केल्यानं नाराज शेतकरीही महायुतीकडे वळले. मोदींच्या एक है तो सेफ है..या घोषणेचं समर्थन करत हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळण्यात ते यशस्वी झाले.
हरीयाणानंतर भाजपनं महाराष्ट्रही जिंकलं आहे. भाजपनं सर्वाधिक जागा जिंकत फडणवीसांनी आपला दबदबा आणखी वाढवला आहे. आधुनिक अभिमन्यू असलेल्या देवाभाऊंकडे भविष्यात पक्ष आणखी मोठी जबाबदारी देऊ शकतो. यात शंकाच नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.