महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्याभोवती फिरतेय, असं म्हटल्यास अतिशियोक्ती होणार नाही. कारण लोकसभेला मविआची सरशी झाली. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता. 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळाला. विधानसभेलाही पवारांच्या पक्षात जोरात इनकमिंग झालंय.
अजित पवारांकडून वारंवार आपल्या काकांच्या वयाचा उल्लेख केला जातो. त्यांना निवृत्तीची साद घातली जातेय. मात्र पवार वयाचा मुद्दा लिलया टोलवतात. आता तर त्यांनी महायुती सरकारला इशाराच दिलाय. मी अजून म्हातारा झालो नाही. सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी धाराशिवमधील सभेतून दिलाय.
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी महायुतीच्या नेत्यांना गळाला लावून सुरुंग लावलाय..मागील महिन्यात फलटणमधल्या सभेतही त्यांनी 84 च काय 90 वर्ष झालं तरी हे म्हातारं काही थांबणार नसल्याचं विधान केलं होतं. आपण महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार पवारांनी व्यक्त केला होता.
पाच दशकांपेक्षा जास्त राजकीय अनुभव असलेल्या पवारांना महाराष्ट्र तोंडपाठ आहे. यापूर्वीही अनेक धक्के पचवून ते निर्धारानं सत्तेत आले आहेत. स्वत: स्थापन केलेला पक्ष फुटल्यानंतरही ते खचले नाहीत. तरुणांना लाजवेल अशा उर्जेने ते प्रचाराला उतरलेत. त्यामुळे लोकसभेसारखाच विजय ते विधानसभा निवडणुकीतही मिळवणार का ?याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.