Manasvi Choudhary
सकाळी उठल्यावर किंवा दात घासताना अनेकदा जिभेवर पिवळ्या किंवा पांढरट रंगाचा थर दिसून येतो. बहुतांश लोक याकडे सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतात, परंतु ही सवय तोंडाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
जिभेवरील पिवळेपणा सहसा गंभीर आजाराचे लक्षण नसले, तरी ते तोंडातील अस्वच्छता आणि इतर दैनंदिन सवयींचे संकेत देते.
जेवण केल्यानंतर अन्नाचे अतिसूक्ष्म कण आणि बॅक्टेरिया जिभेच्या पृष्ठभागावर साचतात. नियमितपणे दात आणि जीभ स्वच्छ न केल्यास हा थर जाड होऊन पिवळसर दिसू लागतो.
लाळ ही तोंडातील ओलावा टिकवून ठेवते आणि अन्नाचे कण व जिवाणू वाहून नेण्यास मदत करते. जेव्हा शरीरात पाणी कमी असते किंवा तोंड कोरडे पडते, तेव्हा जिभेवर मृत पेशी आणि बॅक्टेरिया साचून पिवळा थर तयार होतो.
तंबाखू आणि सिगारेटमधील निकोटीन व रासायनिक घटक जिभेच्या पेशींवर डाग पाडतात. यामुळे जिभेचा नैसर्गिक रंग बदलून त्यावर पिवळा किंवा करडा थर येतो.
चहा, कॉफी किंवा कृत्रिम रंग असलेले अन्नपदार्थ खाल्यानेही जिभेवर तात्पुरता पिवळसर किंवा तपकिरी थर जमा होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.