Bharat Jadhav
दिवसाची सुरुवात करण्यासाठी सकाळचा नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो, तरीही आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक महिला दररोज नाश्ता करणं टाळतात. वेळेचा अभाव असो किंवा वजन कमी करण्यासाठी त्या नाश्ता करणं टाळतात.
जर दीर्घकाळापर्यंत नियमितपणे नाश्ता टाळला. आणि जर शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळाली नाहीत, तर त्याचा परिणाम केवळ ऊर्जेच्या पातळीवरच नाही, तर चयापचय क्रिया, संप्रेरकांशी संबंधित आरोग्य आणि एकूणच आरोग्यावरही होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यात नाश्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. दीर्घकाळ उपाशी राहिल्याने रक्तातील साखरेची पातळी अस्थिर होत असते.
यामुळे दिवसा गोड पदार्थ किंवा 'जंक फूड' खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. जर ही सवय अशीच चालू राहिली, तर त्यामुळे वजन वाढू शकते आणि भविष्यात मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो.
ज्या महिलांना आधीच पीसीओएस थायरॉईडच्या समस्या किंवा अनियमित मासिक पाळी यांसारखे त्रास आहेत, त्यांच्यासाठी ठराविक अंतराने आहार घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
वारंवार नाश्ता न केल्याने शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. यामुळे हार्मोन्सचे असंतुलन वाढू शकते. आधीपासून असलेल्या आरोग्यविषयक समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.
न्याहारी म्हणजे केवळ पोट भरण्याचे साधन नव्हे, तर त्यातून दिवसासाठी आवश्यक असणारे पोषक घटकही मिळतात. सकाळच्या आहारात प्रथिने, तंतूमय पदार्थ (फायबर), कॅल्शियम, लोह आणि विविध महत्त्वाची जीवनसत्त्वांचा समावेश असू शकतो.
जर एखादी महिला सकाळचा नाश्ता टाळत असेल आणि इतर वेळीही संतुलित आहार घेत नसेल, तर तिला पोषक घटकांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, सकाळचा नाश्ता न केल्यास शरीरातील भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात भूक अधिक लागू शकते.