Surabhi Jayashree Jagdish
आपल्या देशात अनेक लोकांच्या नाश्त्रामध्ये अंड्यांचा समावेश असतो. अंडं हे सुपरफूड असून तो प्रोटीनचा एक उत्तम स्रोत मानला जातो.
काहीजण अंडी उकडून, ऑम्लेट बनवून किंवा अंडा करीच्या स्वरूपात बनवून त्याचं सेवन करतात. मात्र अनेकदा लोक बाजारातून आणलेली अंडी थेट उकळण्यासाठी ठेवतात किंवा फ्रिजमधून काढून लगेच ऑम्लेट बनवतात.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अंड्याच्या कवचावर किती प्रकारची घाण आणि बॅक्टेरिया असू शकतात?
जर अंडी स्वच्छ केली गेली नाही तर त्यावरील बॅक्टेरिया तुमच्या अन्नात मिसळून संसर्ग पसरवू शकतात आणि तुम्हाला आजारी पाडू शकतात. त्यामुळे अंडी वापरण्यापूर्वी ती धुणं का आवश्यक आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
अंड्याचा कवच जरी कठीण वाटत असलं तरी त्यावर सूक्ष्म छिद्र असतात. त्यामुळे बाहेरील बॅक्टेरिया अंड्याच्या आतील भागापर्यंत पोहोचू शकतात. पण जर अंडी नीट धुतली गेली तर हा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
अंड्यांवर मुख्यतः साल्मोनेला, ई. कोली आणि कॅम्पिलोबॅक्टर हे बॅक्टेरिया आढळतात. हे जीवाणू प्रामुख्याने पक्ष्यांच्या विष्ठेमुळे, दूषित घरट्यांमुळे किंवा अंडी साठवताना स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे निर्माण होतात.
जर हे बॅक्टेरिया अंड्याच्या सालीवरून तुमच्या शरीरात गेले, तर पोटदुखी, जुलाब किंवा ताप यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
तज्ज्ञ सांगतात की अंडी शिजवण्यापूर्वी वाहत्या पाण्याखाली हलक्या हाताने धुतल्यास त्यावरील बॅक्टेरिया हातांवर, भांड्यांवर किंवा अन्नात जाण्याचा धोका कमी होतो.