Surabhi Jayashree Jagdish
हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्कार आणि नियम सांगितलेत. त्यापैकी अंत्यसंस्काराशी संबंधित अनेक प्रथा शतकानुशतके पाळल्या जात आहेत. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची काळजी घेणं आणि अंत्ययात्रेची तयारी करणं यासाठी काही ठरावीक विधी केले जातात.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नाकात, कानात आणि तोंडासारख्या उघड्या भागांमध्ये कापूस घालण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रथा का पाळली जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो.
हिंदू धर्मातील गरुड पुराण या पवित्र ग्रंथात जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाविषयी माहिती दिली आहे. धार्मिक मान्यतेनुसार, व्यक्तीचे प्राण शरीरातून निघून गेल्यानंतर तिचा आत्मा शरीरापासून वेगळा होतो.
धार्मिक परंपरेनुसार, मृतदेहाची पवित्रता टिकवून ठेवण्याला महत्त्व दिलं जातं. नाक आणि कान यांसारख्या उघड्या भागांमध्ये कापूस घालण्यामागे शरीराचं बाहेरील धूळ, माती आणि कीटकांपासून संरक्षण करणं हा एक उद्देश मानला जातो.
मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार होईपर्यंत त्याची योग्य काळजी घेतली जाते. धार्मिक दृष्टिकोनातून मृतदेहाचा आदर राखणं आणि त्याची पवित्रता जपणं महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे शरीराच्या उघड्या भागांमध्ये कापूस घालून मृत व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सन्मान जपण्याचा प्रयत्न केला जातो.
मृत्यूनंतर शरीरातील विविध जैविक प्रक्रिया बदलतात आणि स्नायू शिथिल होऊ लागतात. काही परिस्थितींमध्ये नाक किंवा तोंडातून द्रव बाहेर येऊ शकतात, त्यामुळे मृतदेहाची स्वच्छता राखणं आवश्यक असते.
काही धार्मिक आणि पारंपरिक मान्यतांनुसार, मृतदेहाची काळजी घेणं हे कुटुंबाचं कर्तव्य मानलं जातं. मृतदेहाच्या उघड्या भागांमध्ये कापूस घातल्यामुळे माश्या, धूळ आणि इतर बाहेरील घटकांचा संपर्क कमी करण्यास मदत होऊ शकते.
या बातमीमध्ये गरुड पुराणातील प्रेतखंड तसेच हिंदू धार्मिक परंपरेत आढळणाऱ्या वर्णनांच्या आधारे मृत्यूनंतर आत्म्याची अवस्था, पुढील शरीर आणि पुनर्जन्मासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यातील उल्लेख हे धार्मिक ग्रंथ व श्रद्धांवर आधारित असून, त्यांना वैज्ञानिक तथ्य किंवा सिद्ध झालेले सत्य म्हणून घेऊ नये.