Surabhi Jayashree Jagdish
बाळाला जन्म दिल्यानंतर अनेक महिलांचं पोट सुटल्यासारखं दिसतं, आणि हा एक अतिशय सामान्य शारीरिक बदल आहे. गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल आणि स्नायूंशी संबंधित बदल होतात. त्यामुळे डिलिव्हरीनंतर महिलांचं पोट सुटू शकतं.
गर्भधारणेदरम्यान शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. हे हार्मोन्स शरीरात चरबी साठवण्यास मदत करतात, ज्यामुळे पोटाचा भाग वाढतो. डिलिव्हरीनंतर हे हार्मोन्स हळूहळू कमी होतात, पण त्याचा परिणाम लगेच दिसून येत नाही.
गर्भ वाढताना पोटाचे स्नायू ताणले जातात आणि काही वेळा ते वेगळेही होतात. याला डायस्टेसिस रेक्टाय म्हणतात. यामुळे पोट सैल आणि मोठं दिसतं. हे स्नायू पुन्हा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो आणि योग्य व्यायाम आवश्यक असतो.
प्रेग्नंसीदरम्यान गर्भाशयाचा आकार खूप मोठा होतो आणि तो पोट पुढे येण्यास कारणीभूत ठरतो. डिलिव्हरीनंतर गर्भाशय हळूहळू मूळ आकारात येतो, पण याला काही आठवडे लागतात. या काळात पोट थोडं बाहेर आलेलं दिसणं सामान्य आहे.
गर्भधारणेदरम्यान शरीर बाळासाठी ऊर्जा साठवण्यासाठी अतिरिक्त चरबी जमा करते. ही चरबी विशेषतः पोट, कंबर आणि मांडीभोवती साठते. डिलिव्हरीनंतर लगेच ही चरबी कमी होत नाही, त्यामुळे पोट सुटलेलं दिसतं.
डिलिव्हरीनंतर सुरुवातीच्या काळात महिलांना जास्त विश्रांती घ्यावी लागते. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात आणि कॅलरीज जळत नाहीत. यामुळे पोटाचा भाग कमी होण्यास वेळ लागतो.
बाळाला स्तनपान करताना महिलांचा आहार वाढतो आणि कॅलरीचं प्रमाण जास्त होतं. काही वेळा गोड किंवा जड पदार्थ जास्त प्रमाणात घेतले जातात. यामुळे वजन आणि पोटाचा घेर वाढलेला राहू शकतो.