Surabhi Jayashree Jagdish
नवीन गाडी खरेदी केल्यानंतर तिची सर्व्हिस कधी करायची, हा प्रश्न अनेकांना पडतो. गाडी १०,००० किलोमीटर चालल्यानंतर किंवा एक वर्ष पूर्ण झाल्यावर सर्व्हिस करावी, असा विचार अनेकजण करतात.
बहुतेक कार कंपन्या गाडीची सर्व्हिस १०,००० किलोमीटर पूर्ण झाल्यावर किंवा एक वर्षानंतर करण्याचा सल्ला देतात. यापैकी जी वेळ आधी येईल त्यानुसार सर्व्हिस करणं योग्य ठरतं.
तुमची गाडी एका वर्षात १०,००० किलोमीटरपेक्षा जास्त चालत असेल तर कंपनीने सांगितलेल्या वेळेनुसार सर्व्हिस करून घ्यावी. गाडी १०,००० किलोमीटर चालण्याआधीच एक वर्ष पूर्ण झालं तरी तिची सर्व्हिस करणं गरजेचं असतं.
काही लोकांना वाटतं की गाडी कमी वापरली तर तिची सर्व्हिस करण्याची गरज नसते. मात्र गाडी कमी चालत असली तरी इंजिन ऑइलची क्वालिटी वेळेनुसार कमी होऊ शकते. तसंच फिल्टर, ब्रेक ऑइल आणि कूलंट यांचीही तपासणी करणं गरजेचं असतं. त्यामुळे कंपनीने सांगितलेल्या वेळेत सर्व्हिस करून घ्यावी.
गाडीच्या सर्व्हिसमध्ये इंजिन ऑइल बदलणं आणि ऑइल फिल्टर आणि एअर फिल्टर तपासणं यांसारखी कामं केली जातात. त्याचप्रमाणे ब्रेक, बॅटरी आणि टायरमधील हवेची तपासणी केली जाते. याशिवाय गाडीचं सस्पेन्शन, कूलंटची पातळी, वायपर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा यांचीही तपासणी केली जाते.
गाडीची वेळेवर सर्व्हिस केल्यामुळे तिचं इंजिन चांगल्या स्थितीत राहण्यास मदत होते. योग्य काळजी घेतल्यास गाडीच्या मायलेजवर आणि कामगिरीवर चांगला परिणाम होऊ शकतो. तसंच गाडी अचानक बंद पडण्याची शक्यता कमी होऊ शकते.
गाडी जास्त चालत असो किंवा कमी, तिची सर्व्हिस कंपनीने दिलेल्या शेड्यूलनुसार करणं महत्त्वाचं आहे. साधारणपणे १०,००० किलोमीटर किंवा एक वर्ष यांपैकी जे आधी पूर्ण होईल, त्यानुसार सर्व्हिसची वेळ ठरवली जाते.