Surabhi Jayashree Jagdish
महाभारतात द्यूतसभेतील खेळात शकुनीने दुर्योधनाच्या वतीने फासे टाकले होते. युधिष्ठिरानेही शकुनी हा द्यूतकलेत अत्यंत पारंगत असल्याचं मान्य केलं होतं.
लोकमान्यतेनुसार शकुनीने आपल्या वडील राजा सुबल यांचे हाड वापरून फासे तयार केले होते. या कथेनुसार ते फासे शकुनीच्या इच्छेनुसारच पडत असत. मात्र, ही कथा महाभारताच्या मूळ चिकित्सक (Critical Edition) आवृत्तीत आढळत नाही.
शकुनी प्रतिस्पर्ध्याच्या मानसिकतेचा अचूक अंदाज घेत असे. तो योग्य वेळी योग्य डाव खेळून समोरच्याला गाफील ठेवत असे. त्यामुळे त्याचा विजय हा केवळ फाशांमुळे नव्हे, तर त्याच्या राजकीय चातुर्यामुळेही होत असे.
दुर्योधनाने पांडवांना पराभूत करण्यासाठी शकुनीवर पूर्ण विश्वास ठेवला होता. युधिष्ठिराला द्यूत खेळण्याची कमजोरी असल्याचे शकुनीला माहीत होतं आणि त्याने त्याचाच फायदा घेतला. त्यामुळे पांडवांनी राज्य, संपत्ती आणि अखेरीस द्रौपदीलाही पणाला लावले.
महाभारताच्या मूळ संस्कृत ग्रंथात किंवा चिकित्सक आवृत्तीत फासे मंत्रबद्ध किंवा जादुई होते, असे स्पष्टपणे सांगितलेलं नाही. अनेक अभ्यासकांच्या मते, शकुनी फसवणुकीच्या तंत्रात आणि द्यूतकलेत इतका प्रवीण होता की तो खेळ आपल्या बाजूने वळवू शकत होता.
भारतीय परंपरेत शकुनीचे फासे कपट, सूड आणि राजकीय कारस्थान यांचे प्रतीक मानले जातात. द्यूतसभेतील हा प्रसंग महाभारत युद्धाचे एक प्रमुख कारण ठरला. त्यामुळे शकुनीचे फासे केवळ खेळाचे साधन नसून विनाशाची सुरुवात मानली जाते.
या विषयासाठी प्रमुख संदर्भ म्हणजे महाभारत, विशेषतः सभापर्व (द्यूतसभा प्रसंग), ज्यामध्ये शकुनीच्या द्यूतकौशल्याचे वर्णन आहे. तसंच The Mahabharata of Krishna-Dwaipayana Vyasa या इंग्रजी अनुवादातही द्यूतसभेचे सविस्तर वर्णन सापडतं.