Surabhi Jayashree Jagdish
भेंडी ही भारतीय स्वयंपाकघरात नेहमी वापरली जाणारी भाजी आहे. भेंडीची साधी भाजी किंवा कुरकुरीत तळलेली भेंडी असे अनेक पदार्थ बनवता येतात. भेंडीचा चिकटपणा अनेकांना आवडत नसला, तरी त्यात विरघळणारे तंतू असतात, जे पाण्याच्या संपर्कात आल्यावर जेलसारखा पदार्थ तयार करतात.
भेंडीमध्ये विरघळणारे तंतू असतात, ज्यांना इंग्रजीत सॉल्युबल फायबर म्हणतात. पाण्यात मिसळल्यावर या तंतूंमुळे चिकट जेलसारखा पदार्थ तयार होतो, त्याला म्युसिलेज म्हणतात. हे तंतू शौच मऊ ठेवण्यास मदत करतात.
डॉ. सौरभ सेठी हे पचनसंस्थेचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये भेंडीच्या चिकटपणामुळे आरोग्याला कसा फायदा होऊ शकतो, हे सांगितलं आहे.
डॉ. सेठी यांच्या माहितीनुसार, भेंडीतील म्युसिलेजमध्ये विरघळणारे तंतू असतात, जे पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरतात. हे तंतू शौचाचं प्रमाण वाढवण्यास आणि ते पचनसंस्थेतून पुढे जाण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात पुरेशा प्रमाणात तंतू घेतल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते.
आपल्या पचनसंस्थेत अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात त्यांना एकत्रितपणे गट मायक्रोबायोम म्हणतात. आहारातील तंतू हे काही उपयुक्त सूक्ष्मजीवांसाठी अन्नाचं काम करतात. त्यामुळे भेंडीसारख्या तंतुमय भाज्यांचा संतुलित आहारात समावेश केल्यास आतड्यांचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होऊ शकते.
डॉ. सेठी यांनी भेंडीबाबत प्रयोगशाळेत आणि प्राण्यांवर केलेल्या काही अभ्यासांचाही उल्लेख केला आहे. या अभ्यासांनुसार, भेंडीतील काही घटक पित्तातील आम्लांशी जोडले जाऊ शकतात. त्यामुळे ही आम्लं शौचावाटे शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होऊ शकते.
पित्तातील आम्लं यकृतात कोलेस्ट्रॉलपासून तयार होतात आणि शरीराला चरबी पचवण्यासाठी मदत करतात. ही आम्लं अधिक प्रमाणात शरीराबाहेर गेल्यास यकृताला नवीन आम्लं तयार करण्यासाठी अधिक कोलेस्ट्रॉल वापरावं लागू शकतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.