Gangappa Pujari
तुम्ही जर झाडांच्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू इच्छित असाल तर सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे दुर्गा टेकडी. पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे 200,000 पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. त्यांची देखभालही केली जाते.
पिंपरी-चिंचवड परिसरात पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे अप्पू घर.इथे जेथे मुले आणि पालकांना चांगला वेळ घालवता येईल. अप्पू घर श्री दुर्गादेवी मंदिराच्या पायथ्याशी हिरवाईने नटलेले आहे. अप्पू घर हे कौटुंबिक सहल, शालेय पिकनिक आणि अगदी कॉर्पोरेट रिट्रीटसाठी एक उत्तम ठिकाण आहे. पिंपरी-चिंचवडमधील हे एक उत्तम ठिकाण आहे.
पुणे ते लोणावळा प्रवासात लोणावळ्या आधीचे रेल्वे स्टेशन म्हणजे मळवली. इथून थोड्याच अंतरावर भाजे हे गाव आहे. भाजे गावापासून चारशे फूट चढून गेल्यावर सुप्रसिद्ध भाजे लेणी आहेत. या लेणी समूहात २२ लेण्यांचा समूह आहे. सर्व लेणी बौद्ध असून हनयान पंथाची आहेत. येथे एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार आहेत. ज्यांना इतिहास आणि प्राचीन संस्कृतीची आवड आहे अशा सर्वांनी ही भेट द्यायलाच हवी.
भाजा लेणींप्रमाणेच कार्ला लेणी देखील दगडात कोरलेली बौद्ध लेणी आहेत. १६ लेणींचा हा समूह असून, ही महायान पंथीय बौद्ध लेणी आहेत. ही लेणी म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत. लेणीपर्यंत जायला पायथ्यापासून ३०० पायऱ्या चढून जावे लागते. या लेणीच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. पिंपरी चिंचवडपासून थोड्या अंतरावर असलेले हे ठिकाणही पर्यटकांठी अगदी खास आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील लोकांना दक्षिणेकडील बालाजी मंदिरात जाण्याची गरज नाही. कारण बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती नारायणपूर या जवळच्या गावात आहे. मिनी तिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण खूप भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि हिरवाईचा आनंद घेतात. हे ठिकाणही पर्यटनासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
बर्ड व्हॅली उद्यान हे देखील विशेषत: कुटुंबांसाठी एक अद्भुत सहलीचे ठिकाण आहे. लहान तलावावर, कुटुंबासह या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. पिंपरी चिंचवड परिसरातील संभाजीनगर भागात हे ठिकाण आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने सात एकर क्षेत्रफळावर सायन्स पार्कचा विस्तार केला आहे. विज्ञानातील अनेक शोध, संदर्भ इमारतीमधील एकूण चार दालनांमध्ये आहेत. वाहनांची संपूर्ण माहिती देणारे ऑटोमोबाइल दालन, वातावरणीय बदलांची माहिती देणारे हवामान परिवर्तन दालन, मनोरंजक विज्ञान, ऊर्जा दालनासह ‘उडी सायन्स शो’ व तारामंडल शो सुविधा उपलब्ध आहेत. मुलांसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
निसर्गाचा सुंदर नजारा पाहण्यासाठी जुन्या मुंबई- पुणे हायवेला नक्की भेट द्या.. जिथे तुम्ही सुंदर फोटो काढू शकता. अनेक जेवणाचे ढाबे आहेत, ज्यावर ताव मारु शकता. पावसाळ्यात जुना महामार्ग आणखीनच सुंदर असतो कारण रस्त्यांच्या कडेला छोटे धबधबे तयार होतात. संपूर्ण महामार्ग धुक्यात रमलेला आहे.
डायमंड पार्क हे पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. साहसी राइड्सने भरलेले एक साहसी उद्यान आहे. या ठिकाणी अनेक साहसी खेळांसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या २८ साहसी राईड्सही अनुभवायला मिळतील. त्यामुळे या ठिकाणीही तुम्ही नक्की भेट द्या.
पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक पाणवठे आहेत आणि याचा मोठा फायदा म्हणजे परिसरात अनेक सुंदर हिरवागार निसर्ग रम्य ठिकाणे पाहायला मिळतात. असेच एक ठिकाण म्हणजे थेरगाव बोट क्लब. थेरगाव येथे स्थित, पिंपरी-चिंचवड परिसरात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.