Shreya Maskar
हिवाळ्यात गरमागरम चहा पिण्याची मजाच काही और असते. त्यातही मडक्यात तयार केलेल्या तंदुरी चहाची चव अनेकांना आवडते. चहाचा मसालेदार स्वाद आणि गरम मडक्याचा खास सुगंध यामुळे तंदुरी चहा अधिक खास लागतो.
तंदुरी चहा बनवण्यासाठी दूध , पाणी, चहा पावडर, साखर, आल्याचा तुकडा, वेलची, लवंगा, चहा मसाला आणि मातीचे मडके (कुल्हड) इत्यादी साहित्य लागते.
तंदुरी चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात ठेचलेले आले, वेलची, लवंग आणि चहा मसाला घाला. हे मिश्रण २ मिनिटे उकळू द्या.
आता त्यात चहा पावडर आणि साखर घाला. चहाला छान रंग येईपर्यंत उकळू द्या. त्यानंतर पातेल्यात दूध घाला. मंद आचेवर चहा ४ ते ५ मिनिटे उकळू द्या. चहा तयार झाल्यानंतर गाळून घ्या.
आता तंदुरी चहासाठी मातीचे स्वच्छ, उष्णता सहन करू शकणारे मडके घ्या. ते गॅसवर किंवा योग्य उष्णता स्रोतावर हळूहळू गरम करा. थंड मडके थेट तीव्र आचेवर ठेवू नका, कारण ते फुटू शकते.
गरम मडके एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात किंवा उष्णतारोधक भांड्यात ठेवा. त्यानंतर तयार केलेला गरम चहा हळूहळू मडक्यात ओता. चहा फेसाळून बाहेर येऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या.
मडक्यातील चहा फेसाळणे थांबल्यानंतर तो कपात ओता. अशा प्रकारे घरच्या घरी मातीच्या मडक्याचा खास सुगंध असलेला तंदुरी चहा तयार होईल.
तंदुरी चहासोबत गरमागरम कांदा भजी, बिस्किटे किंवा खारी खाल्ल्यास हिवाळ्यातील चहाचा आनंद आणखी वाढेल!