Bharat Jadhav
पावसाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येत असतो. त्या पाण्यातून साप देखील वाहून जात असतात. जमिनीच्या बिळांमध्ये पाणी शिरल्यानंतर सापांचा वावर वाढत असतो.
साप चावल्यानंतर मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात किंवा जंगलात, रानावनात फिरताना काळजी घेणं आवश्यक आहे. जर सर्पाने दंश केला तर आपण काय उपाययोजना केली पाहिजे त्याची माहिती हवी.
सर्प दंश केल्यानंतर अनेकजण घाबरून जातात. त्याच भीतीमध्ये घरगुती उपाय करतात. अनेकदा घरगुती उपायामुळे स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
सर्पदंश केल्यानंतर काय करावं आणि काय करू नये याची माहिती असेन तर एखाद्याचा जीव वाचू शकतो.
सर्पाने दंश केल्यानंतर तो घाव पाण्याने धुवून टाका. ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला असेल त्या व्यक्तीच्या हातातील अंगठी, कडा, बूट आणि इतर काही टाईट कपडे असतील तर काढून टाका. रुग्णाला शांत झोपायला सांगा. जास्त हालचाल करू देऊ नका. वेळ न दवडता जवळील रुग्णालयात न्या.
सर्पदंश केल्या ठिकाणी जखम करू नये. त्यावर कोणती पट्टीही बांधू नये. इतकेच नाही तर जेथे दंश झालाय तेथून विष तोंडाने ओढू नये. घरगुती उपाय करण्यात वेळ घालू नका.
रुग्णाला जास्त हलवू नका. रुग्णाची जास्त हालचाल झाली तर शरिरात विष लवकर पसरू शकते.
रुग्णाला लगेच रुग्णालयात न्या. तेथे अँण्टी -वेनम सीरम आणि इतर आवश्यक उपचार केले जातात. खासगी रुग्णालय आणि घरगुती उपाय करण्यात वेळ घालवण्याऐवजी सरकारी रुग्णालयात न्या.