ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावणातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. यादिवशी कोळीबांधव समुद्राची पूजा करुन नारळ अर्पण करतात.
रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा हा सण एकाचदिवशी साजरा केला जातो.
मासेमारी करणार्या कोळी बांधवांचा हा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे.
पावसाळ्यात समुद्राचं पाणी प्रचंड खवळलेलं असल्याने कोळी बांधव मासेमारी करत नाही.
बोटी, जहाजांची वर्दळ पावसाळ्याच्या या महिन्यात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करतात.
कोळीबांधव पारंपारिक वेशात समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. सोन्याचा नारळ, म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ समुद्रात विधिवत सोडला जातो.
समुद्राची पूजा करताना खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आपल्या धन्याचे रक्षण व्हावे यासाठी कोळी भगिनी समुद्राला गाऱ्हाणे घालतात.