कोमल दामुद्रे
मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यातील काही मंदिरे पहिल्या शतकात बांधण्यात आल्याचे पुरावे सापडतात.
असंच एक प्राचीन प्राचीन शिवमंदिर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आहे.
अतिशय सुप्रसिद्ध असलेले आम्रनाथ मंदिर म्हणजेच आताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते.
शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो.
सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे.
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडीत आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत.
या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव आहे, असे सांगितले जाते.
अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे.
या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप काळाच्या ओघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे.
यंदाच्या श्रावण महिन्यात अंबरनाथमधील या प्रसिद्ध शिवमंदिराला नक्की भेट द्या.