Shruti Vilas Kadam
रसगुल्ले बनवण्यासाठी १ लिटर फुल क्रीम दूध, २ चमचे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, १ कप साखर, ४ कप पाणी आणि २ ते ३ वेलची घ्या. हे साहित्य वापरून मऊ आणि रसाळ रसगुल्ले तयार करता येतात.
सर्वप्रथम एका पातेल्यात दूध गरम करा. दूध उकळायला लागल्यानंतर गॅस बंद करा. त्यात थोडे थोडे लिंबाचा रस घालत राहा. दूध फाटून पनीर आणि पाणी वेगळे झाल्यानंतर मिश्रण स्वच्छ मलमलच्या कापडातून गाळून घ्या.
आता पनीर थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे लिंबाचा आंबटपणा कमी होईल. त्यानंतर कापड बांधून ३० ते ४० मिनिटे पाणी निथळू द्या. पनीर पूर्ण कोरडे होणार नाही, याची काळजी घ्या.
तयार पनीर एका ताटात काढा. हाताच्या तळव्याने साधारण ८ ते १० मिनिटे चांगले मळून घ्या. पनीर मऊ आणि एकजीव झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा. गोळ्यांना भेगा राहणार नाहीत याची काळजी घ्या.
एका मोठ्या पातेल्यात १ कप साखर आणि ४ कप पाणी घाला. त्यात वेलची टाकून गॅसवर उकळायला ठेवा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर पाकाला चांगली उकळी येऊ द्या.
आता उकळत्या पाकात पनीरचे गोळे हळूवार सोडा. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण १२ ते १५ मिनिटे शिजवा. रसगुल्ले शिजताना आकाराने मोठे आणि स्पंजी होतील. त्यांना मध्येच हलवू नका.
गॅस बंद केल्यानंतर रसगुल्ले पाकातच थंड होऊ द्या. त्यानंतर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. थंडगार आणि रसाळ रसगुल्ले खाण्यासाठी तयार आहेत. पाहुण्यांना किंवा कुटुंबीयांना हे स्वादिष्ट रसगुल्ले सर्व्ह करा.