Bharat Jadhav
पावसाळ्यात आपल्याला उष्णतेपासून सुटका मिळते, पण या काळात एक समस्या खूप अडचणीची ठरत असते. ही समस्या म्हणजे कपडे वाळवणे. सततची दमट हवा, अपुरा सूर्यप्रकाश आणि हवेच्या खेळत्या प्रवाहाचा अभाव यामुळे कपडे बराच काळ ओलेच राहत असतात.
कपडे कायम ओले राहत असल्यानं कपड्यांना कुबट वास येऊ लागतो, अनेकदा त्यावर बॅक्टेरिया किंवा बुरशीची वाढ होऊ लागते.
पावसाळ्यात तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमचे कपडे ताजे आणि सुगंधी ठेवू शकता.
जास्त डिटर्जंट वापरल्याने कपडे अधिक स्वच्छ होतात असे लोकांना वाटते, पण तसे नसते. अतिरिक्त डिटर्जंटमुळे कपड्यांवर त्याचे अवशेष राहतात, जे ओलावा धरून ठेवत असतात.
अति डिटर्जंट वापरले तर दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांची वेगाने वाढ होऊ शकते. कपडे धुताना कमी प्रमाणात डिटर्जंट वापरा. तसेच कपडे धुताना पाण्यात थोडे पांढरे व्हिनेगर किंवा डेटॉल घालू शकता. यामुळे कपड्यांमधील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
पावसाळ्यात कपडे लवकर सुकवण्यासाठी कपडे नीट पिळून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही वॉशिंग मशीन वापरत असाल तर तुम्ही 'एक्स्ट्रा स्पिन सायकल' चालवू शकता.
जर तुम्ही कपडे घरात वाळवत असाल, तर जिथे हवा खेळती राहील अशी जागा निवडा. खिडकीजवळ किंवा पंख्याखाली कपडे वाळवणे सर्वोत्तम मानले जाते. बाथरूम किंवा स्वयंपाकघरासारख्या जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणी कपडे वाळवणे टाळले पाहिजे.
खोलीत जास्त आर्द्रता असल्यास कपडे वाळण्यास अधिक वेळ लागतो. अशा वेळी एअर कंडिशनर किंवा 'डीह्युमिडिफायर'चा (आर्द्रता शोषून घेणारे यंत्र) वापर करावा. जर या वस्तू उपलब्ध नसतील तर तुम्ही कपड्यांजवळ खडे मीठ किंवा सिलिका जेलची पाकिटे वापर करा. यामुळे ती हवेतील अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यास मदत करतात.
कपडे जवळजवळ वाळलेले असूनही त्यात थोडा ओलावा शिल्लक असेल, तर अशा वेळी इस्त्री करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे उरलेला ओलावा निघून जातो आणि दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरियाही कमी होत असतात.