Bharat Jadhav
कॅन्सर हा असा आजार आहे ज्याच्या नावानेच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. धूम्रपान, मद्यपान आणि अयोग्य आहार यांसारखे घटक यासाठी कारणीभूत असतात. मात्र आपण अनेकदा अशा काही लहान-सहान दैनंदिन सवयी आचरणात आणत असतात ज्यामुळे भविष्यात कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.
कर्करोग तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्ण यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एका अशा सामान्य सवयीकडे लक्ष वेधलंय. ही सवय जवळपास प्रत्येकजण पाळतो: ती म्हणजे झोपताना फोन अगदी डोक्याजवळ ठेवणे. जर तुम्हीही रात्री फोन वापरल्यानंतर तो आपल्या जवळच ठेवत असाल, तर डॉक्टरांनी सावध केलंय.
डॉ. तरंग कृष्ण यांच्या मते, आजकाल बहुतेक लोक झोपताना आपला फोन उशीजवळ ठेवतात. ही सवय वरकरणी सामान्य वाटत असली, तरी भविष्यात त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. यासह डोक्याजवळ फोन ठेवून झोपल्याने मेंदूच्या गाठीचा (ब्रेन ट्यूमरचा) धोकाही संभवतो.
फोनमधून मोठ्या प्रमाणात ईएमएफ (इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन) बाहेर पडतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, या ईएमएफ प्रारणांच्या उच्च पातळीमुळे कॅन्सर होऊ शकतो. याचा संबंध मेंदूतील गाठींशी (ब्रेन ट्यूमर) देखील आहे. या प्रारणांचा संपर्क वाढल्यास रात्री झोपताना फोन जवळ ठेवल्यास भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका संभवतो.
कर्करोग तज्ज्ञांच्या मते, फोनमधून ब्लू लाईट बाहेर पडतो. हा निळा लाईट मेंदूला अति-सक्रिय ठेवतो, ज्यामुळे अंथरुणावर पडूनही कित्येक तास झोप लागणे कठीण जाते. उत्तम आरोग्यासाठी पुरेशी आणि गाढ झोप आवश्यक असते, परंतु फोनच्या वापरामुळे ती मिळवणे कठीण होते.
आजकाल बहुतेक लोक झोपण्यापूर्वी आपल्या फोनवर 'स्क्रोलिंग' करतात. त्यानंतर ते झोपण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना झोप लागण्यास अडचण येते. डॉक्टरांच्या मते, अनेक फोन सोशल मीडिया ॲप्स हे खास करून तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठीच तयार केलेले असतात. यामुळे केवळ तुमची एकाग्रता करण्याची क्षमताच कमी होते.
झोपताना फोन बेडरूमच्या बाहेर ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. फोन तुमच्या जितका जवळ असेल, तितका रेडिएशनचा धोका जास्त असतो. त्यामुळे झोपायला जाण्यापूर्वी तुमचा फोन बेडरूमच्या बाहेर ठेवा.
रात्रीची चांगली झोप मिळवण्यासाठी, झोपायला जाण्यापूर्वी किमान एक तास आधी फोन वापरणे बंद करा. त्याऐवजी तुम्ही एखादे पुस्तक वाचू शकता, कुटुंबाशी गप्पा मारू शकता किंवा ध्यानधारणा करू शकता. यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला गाढ झोप लागेल.