Surabhi Jayashree Jagdish
रसगुल्ले हा गोड पदार्थ बहुतेकांना खूप आवडतो. पण घरी बनवायचा म्हटले की, तो खूप किचकट वाटतो. म्हणून अनेकजण प्रयत्नच करत नाहीत.
मावा किंवा पनीर न वापरता देखील रसगुल्ले बनवता येतात. ही पद्धत सोपी आणि कमी साहित्याची आहे. घरी झटपट गोड बनवण्यासाठी ती उपयोगी आहे.
पहिल्यांदा कुकरमध्ये १ कप साखर आणि दीड कप पाणी घाला. ते मंद आचेवर उकळत ठेवा आणि साखर पूर्ण विरघळू द्या. पाक तयार झाला की पुढची तयारी करा.
एका पॅनमध्ये १ कप दूध गरम करा आणि त्यात १ चमचा साखर घाला. यानंतर त्यात १ कप तांदळाचं पीठ मिसळा. मिश्रण नीट ढवळून एकजीव करा.
या मिश्रणात १ चमचा साजूक तूप घाला आणि हलकं शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
थंड झालेलं मिश्रण ताटात काढून मळून घ्या. त्यात अजून १ चमचा तूप मिसळा आणि मऊ गोळा तयार करा. या गोळ्यापासून छोटे-छोटे रसगुल्ले बनवा.
पाक पुन्हा गरम करून त्यात तयार गोळे टाका. कुकरमध्ये मंद आचेवर २ ते ३ मिनिटं शिजवा आणि शिट्टी येताच गॅस बंद करा. रसगुल्ले १५ मिनिटं पाकात ठेवा. थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा आणि सर्व्ह करा.