Shreya Maskar
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात, कवणई गावाजवळ कवणई (कावनई) किल्ला वसलेला आहे. हा डोंगरी किल्ला आहे. मुंबईपासून सुमारे १२० किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
कावनई किल्ला 'कपिलधारा तीर्थ' या धार्मिक स्थळाजवळील लोकप्रिय ठिकाण आहे. तुम्हाला पावसाळ्यात पहिल्यांदाच ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे.
कावनई किल्ल्यावरून तुम्हाला कळसूबाई शिखराचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे सुंदर निसर्गाच्या सानिध्यात फोटोज् देखील काढू शकता.
कावनई किल्ला हा १७- १८ व्या शतकातील एक गिरीदुर्ग आहे, जो प्रादेशिक व्यापार मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी उभारलेला टेहळणी बुरूज म्हणून वापरला जात असे.
कावनई किल्ल्याचे नियंत्रण मुघल, निजाम आणि पेशवे यांच्या हातातून बदलत गेले. विशेषतः १७६० मधील उदगीरच्या लढाईनंतर तो पेशव्यांच्या ताब्यात आला आणि अखेरीस १८१८ मध्ये कर्नल ब्रिग्स यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी तो जिंकून घेतला.
कावनई किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे २,५०० फूट उंचीवर आहे. हा मार्ग कवणई गावापासून सुरू होऊन गवताळ कड्यावरून पुढे जातो आणि शेवटी लोखंडी शिडीच्या मदतीने उभ्या चढणीचा टप्पा पार करावा लागतो.
मुंबईहून कवणई किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारापर्यंत गाडीने किंवा ट्रेनने प्रवास करा. तिथून 'अप्पर वैतरणा'च्या दिशेने जाणारी स्थानिक बस किंवा टॅक्सी घेऊन 'वाकी जंक्शन' किंवा कवणईच्या पायथ्याशी असलेल्या गावी पोहोचा. त्यानंतर दीड तासाचा ट्रेक करून किल्ल्यावर जाता येते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.