Sakshi Sunil Jadhav
रवा हा अनेक वर्षांपासून भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा लोकप्रिय पदार्थ आहे. उपमा, शिरा, ढोकळा, इडली अशा अनेक पदार्थांमध्ये रव्याचा वापर केला जातो.
सध्या सोशल मीडियावर रवा म्हणजे फक्त मैद्याचंच ग्लोरिफाइड रूप आहे असा दावा केला जात आहे. हा दावा कितपत खरा आहे, याबाबत तज्ज्ञांनी स्पष्ट माहिती दिली आहे. जाणून घेऊयात.
रवा आणि मैदा दोन्ही गव्हापासून तयार होतात, मात्र त्यांची प्रक्रिया वेगळी असते. मैदा जास्त प्रमाणात शुद्ध (refined) केला जातो, तर रवा थोडा जाडसर असल्यामुळे त्याची नैसर्गिक रचना काही प्रमाणात टिकून राहते.
पोषणतज्ज्ञांच्या मते, रव्याला थेट ‘ग्लोरिफाइड मैदा’ म्हणणं जरा चुकीचं आहे. पण रवा फारच पौष्टिक आहे, असं म्हणणंही पूर्णपणे बरोबर ठरणार नाही.
रव्यात फायबरचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे ज्वारी, बाजरी, ओट्स किंवा संपूर्ण गहू यांच्याइतकी पोषणमूल्यं रवा देत नाही.
रव्याचा Glycaemic Index तुलनेने जास्त असल्यामुळे तो लवकर पचतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.
रव्यामध्ये भाज्या, डाळी, दही किंवा थोडंसं तूप अथवा तेल घालून बनवल्याने पचन प्रक्रिया मंदावते. त्यामुळे रक्तातील साखर आणि बीपीवर होणारा परिणाम कमी होऊ शकतो.
दररोज मोठ्या प्रमाणात रव्याचे पदार्थ खाल्ल्याने पोट लवकर भरत नाही आणि साखरेत चढ-उतार होण्याची शक्यता वाढते.