ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई, ही केवळ स्थानिकांसाठी जागा नाही तर एक भावना आहे. तसेच देश- विदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी मुंबई फिरण्यासाठी येतात.
आय लव्ह मुंबई हा ट्रेंड फक्त एक साधे घोषवाक्य नाही तर तो मुंबईकरांमध्ये असलेला अभिमान आणि आपलेपणाची भावना दर्शवतो.
"आय लव्ह मुंबई" ही संकल्पना सुरुवातीला काळा घोडा फेस्टिव्हलचा भाग होती, परंतु या ट्रेंडची लोकप्रियता पाहता अखेर ती कायमस्वरूपी ठेवण्यात आली.
२०१६ मध्ये मुंबईतील काला घोडा फेस्टिव्हलमध्ये हितेश मालवीय आणि हनीफ कुरेशी यांनी "लव्ह मुंबई" हे चित्र देवनागरी लिपीत लिहिलेले आणि हृदय दाखवणारे डिझाइन तयार केले होते.
महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि ह्युमन्स ऑफ बॉम्बे आणि सेंट+आर्ट इंडिया यांच्या प्रयत्नांमुळे हा साइन बोर्ड शहराचा भाग बनला. यानंतर हे वांद्रे रिक्लेमेशन प्रोमेनेड येथे स्थापित झाले.
"आय लव्ह मुंबई" हळूहळू जुहू आणि विले पार्ले येथील बागेत दिसू लागली. स्थानिक क्षेत्रात अभिमान व्यक्त करण्यासाठी लवकरच "मुंबई" हा शब्द "वांद्रे", "मालाड", "घाटकोपर" आणि इतर परिसरांनी बदलला.
आता हे बोर्ड केवळ मुंबईत नसून जवळपास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यांची एकूण संख्या हजारांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.