Surabhi Jayashree Jagdish
कार चालवताना कधीही अचानक जोरात ब्रेक मारू नये. गाडी नेहमी हळू आणि सहज पद्धतीने चालवावी. वारंवार वेग वाढवणं आणि अचानक ब्रेक लावणं टाळल्यास पेट्रोलची बचत होण्यास मदत होते.
गाडी चालवताना सतत गिअर बदलणं टाळावं. रस्त्याची स्थिती आणि ट्रॅफिकनुसार, ५० ते ६० किलोमीटर प्रतितास असा योग्य वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा. एकसारख्या वेगाने गाडी चालवल्यास इंजिनवर जास्त ताण येत नाही आणि पेट्रोल कमी खर्च होते.
ट्रॅफिक सिग्नलवर ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावं लागणार असेल तर गाडीचे इंजिन बंद करावं. गाडी जागेवर उभी असतानाही इंजिन सुरू असल्यास पेट्रोल खर्च होते. त्यामुळे जास्त वेळ थांबताना इंजिन बंद केल्यास इंधनाची बचत होते.
कारचं एअर फिल्टर वेळोवेळी तपासणं आणि गरजेनुसार बदलणं महत्त्वाचं आहे. एअर फिल्टरमध्ये धूळ आणि घाण साचल्यास इंजिनला पुरेशी हवा मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे इंजिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि पेट्रोलचा वापर वाढू शकतो.
गाडीचं इंजिन व्यवस्थित चालण्यासाठी इंजिन ऑइल महत्त्वाचं असतं. त्यामुळे कंपनीने सांगितलेल्या वेळेनुसार इंजिन ऑइल बदलावं. वेळेवर ऑइल बदलल्याने इंजिनचे भाग व्यवस्थित काम करण्यास मदत होते.
कारमधील एसीचा वापर गरजेनुसार करावा. विनाकारण एसी सतत सुरू ठेवणं टाळावं. एसीच्या वापरावर नियंत्रण ठेवल्यास पेट्रोलचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते.
कार कुठेही घेऊन जाण्यापूर्वी प्रवासाचं अंतर आणि पेट्रोलचा अंदाजे खर्च लक्षात घ्यावा. गाडी चालवताना वेग नियंत्रित ठेवणं आणि विनाकारण इंजिन सुरू न ठेवणं यांसारख्या सवयी लावून घ्याव्यात. अशा छोट्या गोष्टींमुळे पेट्रोलची बचत करण्यास मदत होऊ शकते.