Surabhi Jayashree Jagdish
अनेकजण सकाळी गाडी सुरू केल्यानंतर इंजिन गरम होण्यासाठी काही वेळ गाडी जागेवरच सुरू ठेवतात. इंजिन चांगलं गरम व्हावं म्हणून काही लोक ५ ते १० मिनिटंही वाट पाहतात. मात्र आधुनिक गाड्यांमध्ये इंजिन गरम करण्यासाठी एवढा वेळ थांबण्याची गरज नसते.
आजच्या आधुनिक कारमध्ये इंजिन सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं. त्यामुळे गाडी सुरू केल्यानंतर बराच वेळ इंजिन गरम होण्याची वाट पाहावी लागत नाही. काही सेकंदांत गाडी चालवायला सुरुवात करता येते.
बाहेरचं तापमान कितीही असलं तरी गाडी सुरू केल्यानंतर साधारण १५ ते ३० सेकंद ती जागेवर सुरू ठेवणं पुरेसं असतं. या वेळेत इंजिन ऑइल इंजिनच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्यानंतर गाडी हळूहळू चालवायला सुरुवात करावी.
गाडीच्या इंजिनचं योग्य तापमान साधारण ९० ते १०० अंश सेल्सिअस असतं. हे तापमान मिळवण्यासाठी गाडी काही वेळ चालवणं आवश्यक असतं. त्यामुळे सुरुवातीला गाडीचा वेग कमी ठेवून हळूहळू वेग वाढवणं योग्य ठरतं.
गाडी सुरू केल्यानंतर केवळ इंजिनच नाही तर गिअरबॉक्सलाही योग्य प्रकारे काम करण्यासाठी वेळ लागतो. गाडी चालू लागल्यानंतर गिअरबॉक्समधील तेल सर्व भागांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे गिअरबॉक्सला योग्य वंगण मिळतं.
गाडी जागेवरच बराच वेळ सुरू ठेवल्याने इंजिनला काही फायदा होत नाही. या काळात गाडी पुढे जात नसली तरी पेट्रोल किंवा डिझेल खर्च होत असतं. त्यामुळे गरज नसताना इंजिन सुरू ठेवणं टाळावं.
गाडी बराच वेळ जागेवर सुरू ठेवल्यास काही प्रमाणात न वापरलेलं इंधन इंजिन ऑइलमध्ये मिसळू शकतं. त्यामुळे इंजिन ऑइलची क्वालिटी कमी होऊ शकते आणि कार्बन डायऑक्साइडसारख्या वायूंचे उत्सर्जनही होतं. त्यामुळे गाडीचे सरासरी मायलेज कमी होते.