Bharat Jadhav
हिवाळा ऋतू आल्यानंतर तापमान झपाट्याने कमी होते. याचा थेट परिणाम हृदयावर होत असतो. यात आधीच हृदयरोग असलेले, वृद्ध, मधुमेही आणि उच्च रक्तदाब असलेल्यांना हृदयविकाराचा धोका वाढत असतो.
थंडीच्या काळात हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागला तर त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. याचे अनेक लक्षण दिसत असतात, यातील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा जडपणा येणे. डाव्या हाताला, खांद्याला किंवा पाठीलाही जडपणा जाणवत असतो.
तर काही लोकांना जबड्यात किंवा मानेमध्येही वेदना होत असतात. हिवाळ्यात लोक बहुतेकदा ही लक्षणे गॅस, अशक्तपणा किंवा सामान्य थकवा आला म्हणून याकडे दुर्लक्ष करत असतात.
जर तुम्हाला चालताना, पायऱ्या चढताना किंवा थंड हवामान असताना बाहेर फिरायला गेलात आणि छातीत दुखत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान आणि उपचार केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
राजीव गांधी रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे डॉ. अजित जैन यांच्यामते, थंडीमुळे आपल्या शिरा आकुंचन पावतात.
थंडीमुळे शरीराचे तापमान कमी होते आणि रक्त थोडे घट्ट होत असते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो.
थंडीत हृदय शरीराला उबदार ठेवण्यासाठी अधिक मेहनत करत असते. यामुळे हृदयाला अधिक ऑक्सिजनची गरज असते. यामुळे कमकुवत हृदय असलेल्या लोकांना धोका जास्त असतो.
थंडीत वॉर्म-अप न कर जास्त काम किंवा व्यायाम केल्याने हृदयावर अचानक ताण येऊ शकतो. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.