Bharat Jadhav
रात्री अंथरुणावर पडल्यावर तुम्हालाही झोपेसाठी तळमळावे लागते. वारंवार कूस बदलूनही झोप लागत नाही का? दिवसभरातील कामाचे विचार, उद्याची चिंता आणि क्षुल्लक गोष्टींचे विचार तुमच्या मनात सतत घोळत असतात का?
शास्त्रज्ञांनी एक अत्यंत सोपी आणि जलद पद्धत शोधून काढली आहे. झोपण्यापूर्वी केवळ एक तास याचा सराव केल्यास तुम्हाला लवकर झोप लागण्यास आणि चांगली झोप मिळण्यास मदत होईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही औषधाची किंवा खर्चाची गरज नाही.
सोपी पद्धत म्हणजे, झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी करायच्या कामांची एक छोटी यादी तयार केली जाते. होय, फक्त कागद आणि पेन घ्या आणि उद्या पूर्ण करायची कामे लिहून काढा. याचा नक्कीच फायदा होतो हे वैज्ञानिक पुराव्यानिशी सिद्ध केलंय.
२०१८ मधील एका अभ्यासात, ५७ लोकांची दोन स्वतंत्र गटांत विभागणी करण्यात आली. एका गटाला झोपण्यापूर्वी पाच मिनिटे काढून दुसऱ्या दिवशी पूर्ण करायच्या कामांची यादी लिहिण्यास सांगण्यात आले. तर दुसऱ्या गटाला गेल्या काही दिवसांत आधीच पूर्ण केलेल्या कामांची यादी लिहिण्यास सांगण्यात आले.
ज्यांनी दुसऱ्या दिवशी करायच्या कामांची यादी लिहिली, त्यांना आधीच पूर्ण केलेल्या कामांची यादी लिहिणाऱ्यांच्या तुलनेत खूप लवकर झोप लागली.
यामागचे कारण अतिशय रंजक आहे. आपला मेंदू अपूर्ण राहिलेल्या कामांची सतत चिंता करत असतो. मानसशास्त्रात याला 'अनफिनिश्ड टास्क इफेक्ट' असे म्हटले जाते.
जेव्हा आपण ही कामे कागदावर लिहून ठेवतो, तेव्हा ती माहिती सुरक्षित आहे आणि तिची सतत आठवण ठेवण्याची गरज नसते. याची खात्री मेंदूला पटते. यामुळे मनाला दिलासा मिळत असतो आणि झोप लागणे सोपे लागत असते.
ही पद्धत खास आहे कारण ती पूर्णपणे मोफत आहे. झोपण्यापूर्वी एक तास आधी फक्त एखादी डायरी किंवा कागदाचा तुकडा घ्या आणि दुसऱ्या दिवसासाठी तुम्हाला आठवणारी सर्व कामे लिहून काढा.