Surabhi Jayashree Jagdish
मीठ ओलं झालं असेल तर सर्वप्रथम ते एका स्वच्छ आणि कोरड्या प्लेटमध्ये काढा. प्लेटमध्ये मिठाचा जाड थर करण्याऐवजी ते पातळ थरात पसरवा. असं केल्यामुळे मिठातील ओलावा बाहेर पडण्यास मदत होते.
मिठातील ओलावा कमी करण्यासाठी प्लेट काही वेळ उन्हात ठेवा. मीठ पूर्णपणे कोरडं होईपर्यंत ते तिथेच राहू द्या. अधूनमधून मीठ तपासा आणि त्यातील ओलावा कमी झाला आहे का ते पाहा.
मिठात जास्त ओलावा असेल तर ते मंद आचेवरही वाळवता येतं. यासाठी स्वच्छ आणि कोरड्या कढईत मीठ घेऊन अगदी कमी आचेवर गरम करा. मीठ गरम करताना काळजी घ्या आणि ते जास्त तापणार नाही याची खबरदारी घ्या.
मीठ कढईत गरम करताना ते सतत चमच्याने ढवळत राहा. त्यामुळे मिठाला एकाच बाजूने जास्त उष्णता मिळणार नाही. मीठ कोरडं झाल्यावर गॅस बंद करा आणि कढई बाजूला ठेवा.
गरम केलेलं मीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्यात भरा. त्यासाठी स्वच्छ, कोरडा आणि हवाबंद डबा वापरा. मीठ गरम असतानाच डब्यात भरल्यास वाफेमुळे पुन्हा ओलावा निर्माण होऊ शकतो.
मिठाच्या डब्यातून मीठ काढताना नेहमी स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरा. मिठाची डबी गॅसजवळ किंवा सिंकच्या अगदी शेजारी ठेवू नका, कारण तिथे वाफ आणि पाण्याचे थेंब लागू शकतात. या गोष्टींची काळजी घेतल्यास मीठ जास्त काळ कोरडं आणि सहज वापरण्यायोग्य राहू शकतं.
मीठ साठवताना डब्याचं झाकण व्यवस्थित बंद ठेवा. डबा ओलसर जागी ठेवल्यास मिठात पुन्हा ओलावा शिरू शकतो. त्यामुळे मीठ कोरडं राहण्यासाठी डबा नेहमी कोरड्या जागी ठेवा.