Shreya Maskar
ग्वाल्हेर किल्ला भारतातील मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर शहरात वसलेला आहे. हे इतिहासातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक लोकेशन आहे.
ग्वाल्हेर किल्ला 'गोपाचल' नावाच्या एका स्वतंत्र वालुकाश्म (सँडस्टोन) पठारावर वसलेला आहे, जो आसपासच्या मैदानी प्रदेशापासून सुमारे १०० मीटर उंचीवर आहे आणि मुख्य शहर केंद्रापासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर आहे.
सूरज सेन नावाच्या राजाने संत ग्वालिप यांच्या सन्मानार्थ ग्वाल्हेर किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्याच्या उभारणीला प्राचीन काळात साधारण सहावे शतक किंवा त्यापूर्वी सुरुवात झाली आहे.
ग्वाल्हेर किल्ल्यात मानसिंह महाल आहे. जो राजा मानसिंह तोमर याने १५व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. मानसिंह महालावरील रंगीत टाइल्स, प्राणी आणि भौमितिक नक्षी प्राचीन कलाकौशल्याची साक्ष देतात.
किल्ल्याच्या परिसरात अनेक प्राचीन जलकुंड आणि जलसाठे आहेत. उंच टेकडीवरील किल्ल्यात पाण्याची उपलब्धता राखणे संरक्षण आणि दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचे होते.
गुजरी महाल येथे पुरातत्त्व संग्रहालय आहे. येथे प्राचीन मंदिरे, शिल्पे पाहायला मिळतात. तसेच येथे किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी लाईट अँड साऊंडचा कार्यक्रमही होतो.
किल्ल्यावरील चतुर्भुज मंदिरातील शिलालेख गणिताच्या इतिहासासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यात शून्याचा उल्लेख आढळतो. पूर्वेकडील ऐतिहासिक मार्गावर सलग प्रवेशद्वारे आणि वळणदार चढण असल्यामुळे शत्रूंची प्रगती रोखणे सोपे होत असे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.