Shraddha Thik
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. तसेच हिंदू कॅलेंडरनुसार पहिला सण असून या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते.
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरे केले जाते. यंदा हा सण हा 9 एप्रिल 2024 रोजी आला आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून घराची स्वच्छता करून दारासमोर रांगोळी काढावी. तसेच गुढी कशी उभारावी जाणून घ्या.
पहिल्यांदा काठी घ्यायची. ही काठी आपण स्वच्छ धुतलेली असावी. नंतर ती कोरड्या कापडाने पुसावी. त्या काठीला सुशोभित करण्यासाठी पहिल्यांदा हळद लावायची. मग कुंकू लावायचं. त्यानंतर अष्टगंध लावा.
त्यानंतर त्याला वस्त्र बांधायचं. वस्त्र बांधायला सोपं जावं म्हणून त्याच्या छोट्या छोट्या निऱ्या करून घ्यावात. वस्त्राला जे काठ असतात त्या काठाची बाजू खालच्या बाजूने ठेवायची. कारण तसे दिसायला छान दिसते. त्यानंतर हे वस्त्र काठीला सुतळीने बांधायचे. त्यानंतर गुढीला आंब्याची डहाळी बांधून घ्यायची.
त्यानंतर कडुनिंबाचा पाला लावायचा आहे. त्यानंतर गुढीला साखरेच्या गोड गाठी बांधायच्या. महत्वाचे म्हणजे हे सगळं एकाच सुतळीने बांधून घ्यायचं आहे.
कारण असे केल्याने हे सर्व गुढीला चांगलं घट्ट बसतं. हे सगळं बांधून झाल्यावर त्यावर कलश बांधून ठेवायचा आहे. हे सगळ झाल्यानंतर गुढीची पूजा करावी.