Bharat Jadhav
आपल्यातील अनेकजण सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेतून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात. मात्र तारण ठेवलेले दागिने बँकेच्या ताब्यात असताना चोरीला गेले, हरवले किंवा नुकसान झाले तर अशा परिस्थितीत ग्राहकाला बँकेकडून भरपाई मिळू शकते का?
सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतल्यानंतर ते बँक किंवा संबंधित वित्तीय संस्थेच्या ताब्यात राहतात. कर्जाची संपूर्ण परतफेड झाल्यानंतर हे दागिने ग्राहकाला परत करतात. त्यामुळे जोपर्यंत सोनं बँकेत ठेवलं असतं तोपर्यंत दागिन्यांची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी कर्ज देणाऱ्या संस्थेवर असते.
भरपाईची रक्कम प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीनुसार ठरू शकते. तारण ठेवलेल्या सोन्याचे मूल्य, चोरी किंवा नुकसान कसे झाले, संबंधित संस्थेची जबाबदारी आणि नियम यांचा विचार केला जात असतो. तारण म्हणून किती सोने दिले, त्याचे वर्णन, वजन आणि मूल्य याची कागदपत्रे जपून ठेवणे गरजेचं आहे.
समजा ग्राहकाने सोन्याचे कर्ज पूर्णपणे फेडले. त्यानंतर बँकेकडून दागिने परत मिळणे अपेक्षित आहे. मात्र बँकेच्या ताब्यात असतानाच दागिने चोरीला गेले, तप अशा प्रकरणात कर्जाची परतफेड झाली आहे की नाही, यापेक्षा दागिने कोणाच्या ताब्यात होते, हा महत्त्वाचा मुद्दा ठरत असतो, त्यामुळे ग्राहक तक्रार करू शकतो.
आधी संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेकडे लेखी तक्रार करावी. समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे किंवा संबंधित नियामकाकडे दाद मागता येते.
कर्ज करार, तारण पावती, सोन्याचे वजन आणि तपशील, दागिन्यांचे वर्णन, कर्जाची परतफेड केल्याची पावती, बँकेशी केलेला पत्रव्यवहार इत्यादी कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक असतं.