Surabhi Jayashree Jagdish
पितृपक्षातील दिवस पूर्णपणे पूर्वजांना समर्पित मानले जातात. या काळात पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण केलं जातं आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी पिंडदान व श्राद्ध केलं जातं. गया याठिकाणी पितरांचं पिंडदान केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात, अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे.
मृत्यूनंतर दिवंगत व्यक्तीच्या आत्मशांतीसाठी तिची संतती पिंडदान आणि श्राद्ध करते, अशी हिंदू धर्मातील परंपरा आहे. गया याठिकाणी असं एक मंदिर आहे, जिथे व्यक्ती जिवंत असतानाच स्वतःचं पिंडदान आणि श्राद्ध करू शकते.
हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, मृत्यूनंतर पिंडदान आणि तर्पण न झाल्यास दिवंगत आत्म्याला शांती मिळत नाही. ज्यांना स्वतःचं क्रियाकर्म करण्यासाठी संतती किंवा जवळचा नातेवाईक नसतो, असे काही लोक जिवंतपणीच स्वतःचं पिंडदान करतात. अशा प्रकारे मृत्यूनंतरचं धार्मिक विधी स्वतःच्या हयातीत पूर्ण करण्याची ही परंपरा मानली जाते.
या मंदिरात भगवान विष्णू जनार्दन स्वरूपात विराजमान असून ते मनुष्याचे पिंडदान स्वीकारतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. वैराग्य स्वीकारलेले किंवा संन्यास घेतलेले लोकही याठिकाणी स्वतःचं पिंडदान करतात.
गया याठिकाणी आल्यानंतर भगवान जनार्दन स्वामींच्या मंदिरात जाऊन प्रथम संकल्प केला जातो. त्यानंतर पापांचं प्रायश्चित्त करून पूजा-अर्चना आणि जप केला जातो. या विधीत दही आणि तांदळापासून तयार केलेलं तीन पिंड भगवान जनार्दनांना अर्पण केले जातात आणि हा श्राद्धविधी तीन दिवस चालतो.
गयामध्ये जिवंत व्यक्ती स्वतःचं पिंडदान करते असं हे एकमेव मंदिर असल्याचं सांगितलं जातं. गया परिसरात ५४ पिंडदेवी आणि ५३ पवित्र स्थळं आहेत. मात्र स्वतःचं पिंडदान करण्यासाठी हे विशेष स्थान मानलं जातं.
जनार्दन मंदिर प्राचीन आहे. याठिकाणी भगवान विष्णूंची दिव्य प्रतिमा असून स्वतःचं पिंडदान करण्याबरोबरच पूर्वजांचं पिंडदान करण्यासाठीही भाविक येतात.