Surabhi Jayashree Jagdish
नेहा बोरा या भारतीय विद्यार्थी राजकारणातील एक चर्चेत असलेल्या तरुण नेत्या आहेत. त्या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) या विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सध्या दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांचे अडथळे पार करत घोषणा देतानाचे त्यांचे व्हिडिओ चर्चेत आले.
नेहा बोरा यांचा जन्म उत्तराखंडमधील खटीमामध्ये झाला. त्यांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. वडिलांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असल्यामुळे नेहा यांचे बालपण विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या वातावरणात गेले.
नेहा यांनी दहावी, अकरावी आणि बारावीचे शिक्षण पश्चिम बंगालमध्ये पूर्ण केलं. शालेय जीवनातच त्यांना सामाजिक प्रश्न आणि राजकारण यांची आवड निर्माण झाली. चारू मजुमदार, पाब्लो नेरुदा आणि अरुंधती रॉय यांच्या विचारांचा आणि लिखाणाचा त्यांच्या विचारांवर प्रभाव पडला.
राजकारणात एक्टिव्ह होण्यापूर्वी नेहा यांची ओळख नाटकांमध्ये काम करणारी कलाकार अशी होती. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली येथून परफॉर्मन्स स्टडीज या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्समध्ये थिएटर आणि परफॉर्मन्स स्टडीज या विषयात पीएचडीसाठी प्रवेश घेतला.
नेहा यांनी दिल्लीतील ‘संगवारी’ या स्ट्रीट थिएटर ग्रुपसोबत काम केलं. त्यांच्या मते, नाटकामुळे वेगवेगळ्या समाजातील लोकांचं जीवन आणि त्यांचे विचार समजून घेता येतात. एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्यापेक्षा वेगळे असले तरी त्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेण्याची शिकवण नाटकातून मिळते.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेत असताना नेहा डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी राजकारणाकडे आकर्षित झाल्या. त्यानंतर त्या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन म्हणजेच AISA या संघटनेशी जोडल्या गेल्या. स्पष्ट बोलण्याची पद्धत, भाषणं आणि नेतृत्व करण्याची क्षमता यामुळे त्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचल्या.
नेहा २०१८ पासून विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्यांमध्ये एक्टिव्ह होत्या. २०२६ मध्ये नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनामुळे त्यांची देशभरात चर्चा झाली. दिल्लीतील जंतरमंतरमध्ये त्यांनी शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजाविरोधातील आंदोलनात भाग घेतला आणि त्याचं नेतृत्व केलं.
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात नेहा यांनी मनीष कुमार आणि अमीन अमितोज यांच्यासोबत जंतरमंतरमध्ये उपोषण केलं. हे उपोषण २३ दिवस चाललं आणि त्यात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि खासदारांनी सहभाग घेतला.
दीर्घकाळ उपोषण केल्यामुळे नेहा यांच्या वजनात सुमारे आठ किलो घट झाली होती. या आंदोलनातून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. या आंदोलनामुळे नेहा यांची देशातील तरुणांमध्ये खासकरून Gen-Z म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या पिढीमध्ये, अधिक चर्चा होऊ लागली.
नेहा यांनी झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा आणि झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनांतही सहभाग घेतला. रांचीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर शाई फेकल्याची घटना समोर आली. अशा प्रकारांमुळे तरुणांच्या प्रश्नांवरील आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
नुकतंच अलीकडे नेहा यांनी मतदार याद्यांच्या SIR वर प्रश्न उपस्थित केलेत. या प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत AISA आणि इतर आंदोलनकर्त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.