Surabhi Jayashree Jagdish
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे आणि शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण अनेक पदार्थ खातो. अशावेळी कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
अनेकांच्या मनात प्रश्न असतो की कापून ठेवलेलं कलिंगड खावं का. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर चुकीच्या पद्धतीने कलिंगड कापून ठेवलं तर ते खराब होण्याची शक्यता असते.
एकदा कापून ठेवलेलं कलिंगड खोलीच्या तापमानाच्या २ तासांपर्यंत खाणं सुरक्षित असतं. जर बाहरेचं तापमान जास्त असेल तर हा वेळ आणखी कमी होतो. २ तासांपेक्षा जास्त वेळ कापून ठेवलेलं कलिंगड खाणं टाळावं.
अनेकजण कलिंगड कापून ते फ्रिजमध्ये ठेवतात. अशावेळी जर तुम्ही एअरटाइट डब्यात कलिंगड कापून ठेवत असाल तर ते ३-४ दिवस चांगलं राहतं. त्याचप्रमाणे फ्रिजचं तापमान योग्य असेल तर त्याचा ताजेपणा आणि चव टिकून राहते.
कापून ठेवलेल्या कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोकाही अधिक असतो. अशावेळी जर तुम्ही कापून कलिंगड उघड्यावर ठेवलं तर त्याची चव आणि रंग तसंच वास बदलण्याची शक्यता असते.
जर तुम्ही कापून ठेवलेल्या कलिंगडातून विचित्र वास येत असेल तर समजा ते खराब झालंय. कलिंगडाला एका प्रकारचा आंबट वास आला तर ते खराब झालेलं असू शकतं. त्याचप्रमाणे त्याचा रंग फिकट झाला आणि चिकटपणा वाढला तर ते खाणं टाळावं.
जर तुम्ही कलिंगड वारंवार फ्रिजमधून बाहेर काढत असाल तर त्याच्या तापमानात बदल होतो. यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे सतत कलिंगड फ्रिजमधून बाहेर काढणं टाळावं.