ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपला चेहरा कोणत्या आकाराचा आहे. यावरूनच आपल्या केसांची स्टाईल कशी असावी, आपण कशा प्रकारचे कपडे घालावेत हे ठरवता येते.
बऱ्याच जणांना त्यांच्या चेहऱ्याचा आकार माहीत नसतो. यामुळे स्टाइल करणे कठीण जाते आणि चुकीच्या स्टायलिंगचा परिणाम पर्सनॅलिटीवर होतो.
पण या सोप्या ट्रिकच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा आकार ओळखू शकता, आणि हवीतशी स्टायलिंग करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मोजपट्टी, वही, पेन या तीन वस्तूंची गरज आहे.
मोजपट्टीच्या सहाय्याने कपाळाच्या डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला जिथे भुवया संपतात, तिथून कपाळाची रूंदी मोजा. त्याप्रमाणे गालाच्या हाडापासून डाव्या ते उजव्या बाजूची रूंदी मोजा.
चेहऱ्याच्या एका बाजूच्या कानापासून हनुवटीपर्यंतचे माप घ्या. त्याचप्रमाणे चेहऱ्याच्या दुसऱ्या बाजूचेही माप घ्या. मिळालेल्या दोन्ही मापांचा गुणाकार करा. मिळालेली संख्या म्हणजे तुमच्या जबड्याचे माप असेल.
जिथून केसांची सुरूवात होते तिथून कापाळाच्या मध्यभागापासून ते हनुवटीच्या शेवटपर्यंतचे माप घ्या. ही सगळी मापे एका वहीमध्ये लिहून घ्या.
चेहऱ्याची लांबी जास्त असेल, कपाळाची रूंदी कमी असेल आणि हनुवटी गोल असेल तर तुमचा चेहरा अंडाकृती आहे. तसेच चेहऱ्याची लांबी आणि गालाची रूंदी सारखी असेल तर तुमचा चेहरा गोलाकार आहे.
कपाळ, गाल व जबडा तिन्हीचे माप जवळजवळ सारखे असेल तर तुमचा चेहरा चौरस आकाराचा आहे. तुमच्या चेहऱ्याची रूंदी कपाळापासून हनूवटीकडे जाताना कमी होत जात असेल तर तुम्ही हृदयाकृती चेहऱ्याचे आहात.
गालाची रूंदी कपाळ आणि हनूवटीच्या रूंदीपेक्षा जास्त असेल तर तुमचा चेहरा अष्टकोनी म्हणजेच डायमंड आकाराचा आहे. तसेच कपाळापासून हनूवटीपर्यंतची लांबी जास्त आणि रूंदी कमी असेल तर तुमचा चेहरा आयताकृती आहे.