Bharat Jadhav
जेव्हा एखाद्याला फिट (अपस्माराचा झटका) येते, तेव्हा लोक लगेचच बूट, चप्पल किंवा मोजा हुंगायला देतात. काहीजण त्या व्यक्तीच्या तोंडात चमचा घालतात, तर काहीजण त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करतात.
या जुन्या पद्धती आजही पाळल्या जातात आणि लोक अनेकदा त्यांना उपचाराचाच एक प्रकार मानतात. मोजा किंवा बूट हुंगायला लावल्याने खरोखरच फिट येणे थांबते की हा केवळ एक मिथक आहे, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असते.
डॉक्टरांच्या मते, मिरगी अपस्मार (epilepsy) हा मेंदूशी संबंधित एक मज्जासंस्थेचा विकार आहे. यात मेंदूची कार्यपद्धती अचानक असामान्य होते. यामळे रुग्णाला फिट्स (झटके) येऊ शकतात, तो बेशुद्ध पडू शकतो. काही वेळ एकटक तो बघत राहतो.
फिट आल्यास रुग्णाला शुद्धीवर आणण्यासाठी बूट, चप्पल किंवा मोजा हुंगायला देण्याची पद्धत बऱ्याच काळापासून प्रचलित आहे. पण डॉक्टरांच्या मते हा केवळ एक समज असून . याला उपचाराचा एक प्रकार म्हणून कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
बहुतेक प्रकरणांमध्ये मिरगीचा झटका काही सेकंदांपासून ते एक-दोन मिनिटांत आपोआप थांबतो. या काळात जर एखाद्याने रुग्णाला बूट किंवा मोजा हुंगायला दिला आणि त्यानंतर रुग्ण ठीक झाला, तर लोकांना समज होतो की, त्या कृतीमुळेच रुग्ण बरा झाला. परंतु झटका येणं ही त्याची नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्ण बरा होत असतो.
फिट्स येणे हा मेंदूशी संबंधित एक विकार आहे. यात मज्जापेशी (न्यूरॉन्स) एकाच वेळी अतिप्रमाणात विद्युत संकेत प्रसारित करतात. यामुळे काही काळासाठी मेंदूचे सामान्य कार्य विस्कळीत होते. परिणामी व्यक्तीला फिट येऊ शकते.