ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोमधून विनोदवीर कुशल बद्रिके महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला.
कुशल बद्रिके हा विनोदाचं अचूक टायमिंग तर साधतोच, पण त्यातही काही नवीन करण्याची त्याची धडपड कार्यक्रम बघताना दिसते.
एखाद-दुसऱ्या एपिसोडमध्ये कुशल आपली पत्नी सुनयना आणि तिच्या क्लासबद्दल विनोदी शैलीत सांगत असतो.
त्याचवेळी त्याचे सहकलाकार त्याला टोकतात अन् पुरे कर बायकोच्या क्लासचं प्रमोशन असं बजावून सांगतात अर्थात तेही विनोदी अंगानंच!
आता जाणून घेऊयात की कुशल बद्रिकेची बायको नेमकी आहे कोण? सध्या ती काय करते?
कुशल बद्रिकेची बायको ही उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे.
ती सध्या 'मुघल-ए आझम' या रंगभूमीवरील महानाट्यात काम करताना दिसत आहे.
बायको इतकी मोठी कलाकार मग कुशल बद्रिके कौतुकाचे पूल बांधणारच ना! त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय.
अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर येथे 'मुघल-ए-आझम'चा फ्लॅश मॉबचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. त्यात कुशलची पत्नीही सहभागी आहे.
"मोठी कामगिरी म्हणतात ना ती हीच... अभिनंदन मुघल-ए-आझम टीम", असं कौतुक त्यानं पोस्टमधून केलंय.