Surabhi Jayashree Jagdish
आजकाल पेट्रोल पंपांवर अनेकजण कारच्या टायरमध्ये नायट्रोजन भरून घेताना दिसतात. नायट्रोजन भरल्याने कारचं मायलेज वाढतं आणि टायर जास्त काळ टिकतात, असं अनेकांना वाटतं. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर सामान्य हवेबरोबर नायट्रोजन भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
नायट्रोजन भरण्याचा एक फायदा म्हणजे टायरमधील हवेचा दाब जास्त काळ योग्य पातळीवर राहण्यास मदत होऊ शकते. सामान्य हवेत नायट्रोजनसोबत ऑक्सिजन आणि इतर वायू असतात, तसंच हवेतील ओलाव्याचं प्रमाण बदलू शकतं. टायर गरम झाल्यावर त्यातील हवेचा दाब बदलतो, त्यामुळे योग्य दाब नियमित तपासणं आवश्यक असतं.
टायरमध्ये योग्य दाब असल्यास गाडी चालताना टायरला रस्त्यावर फिरण्यासाठी कमी प्रतिकार होतो आणि इंधनाची बचत होण्यास मदत मिळू शकते. लांबच्या प्रवासात आणि जास्त तापमान असलेल्या ठिकाणी नायट्रोजन वापरण्याचे काही फायदे होऊ शकतात.
फक्त नायट्रोजन भरल्याने कारचं मायलेज मोठ्या प्रमाणात वाढेल, असं समजणं योग्य नाही. गाडी चालवण्याची पद्धत, वेळेवर सर्व्हिसिंग आणि टायरमधील हवेचा योग्य दाब या गोष्टी मायलेजसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नायट्रोजन भरण्याबरोबरच कारची नियमित देखभाल करणंही गरजेचं आहे.
टायरमध्ये योग्य दाबाने सामान्य हवा भरली तरी कार चांगलं मायलेज देऊ शकते. वारंवार वेग वाढवणं, अचानक ब्रेक लावणं आणि गाडीची योग्य देखभाल न करणं यामुळे इंधन जास्त खर्च होऊ शकतं. त्यामुळे टायरमधील हवेचा दाब नियमित तपासा आणि गाडी शक्यतो स्थिर वेगाने चालवा.
नायट्रोजन टायरमधील हवेचा दाब जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो पण तो मायलेज वाढवण्याचा उपाय नाही. टायरमध्ये सामान्य हवा भरली तरी योग्य दाब राखल्यास चांगलं मायलेज मिळू शकतं.