Bharat Jadhav
क्रॉनिक किडनी डिसीज आधी प्रामुख्याने वृद्ध किंवा ५०-६० वर्षांवरील व्यक्तींना होत असायचा. आता हा मोठ्या प्रमाणावर तरुणांनाही आपल्या विळख्यात घेत आहे. डॉक्टरांच्या मते तरुण रुग्णांमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांचे निदान होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
आधुनिक जीवनशैलीच्या सवयी, चयापचयाशी संबंधित विकार आणि वैद्यकीय तपासणीतील विलंब यामुळे विशी, तिशी आणि चाळिशीतील लोकांमध्ये मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत घट होतेय.
या आजाराची धोकादायक बाब म्हणजे हा आजार अनेकदा शरीरात गुपचूपपणे वाढत असतो, जेव्हा त्याचे निदान होते, तेव्हा बऱ्याचदा खूप उशीर झालेला असतो.
अशी अनेक कारणे असू शकतात ज्यामुळे हळूहळू ही गंभीर स्थिती होत असते. तरुणांमध्ये मूत्रपिंड आजाराचे प्रमाण वाढण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.
भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते. यामुळे मूत्रपिंडांमधील लहान रक्तवाहिन्यांचे हळूहळू नुकसान होत असते. तरुणांमधील दीर्घकालीन मूत्रपिंड आजाराचे हे एक प्रमुख कारण आहे.
तरुणांमधील उच्च रक्तदाबामुळेही मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढतो. यामुळे मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांवर ताण येतो. अनियंत्रित रक्तदाबामुळे मूत्रपिंडाच्या उतींचे नुकसान होऊन मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
डिहायड्रेशन म्हणजेच अपुरे पाणी पिणे याचा मूत्रपिंडांवर परिणाम होतो. दिवसभरात द्रवाचे सेवन कमी केल्यास मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. उष्ण हवामानात किंवा ज्यांना खूप घाम येतो अशा व्यक्तींच्या बाबतीत हे अधिक घडत असते.