Surabhi Jayashree Jagdish
मोबाईलची बॅटरी लवकर संपण्यामागे अनेक कारणं असू शकतात. स्क्रीनचा जास्त प्रकाश, सतत इंटरनेटचा वापर आणि बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले ॲप्स यामुळे बॅटरी लवकर कमी होते. बॅटरी जुनी झाल्यास तिची चार्जिंग टिकवून ठेवण्याची क्षमताही कमी होऊ शकते.
मोबाईलची बॅटरी शून्य टक्क्यांपर्यंत संपेपर्यंत थांबणं टाळावं. आजच्या बहुतांश मोबाईलमध्ये लिथियम-आयन किंवा लिथियम-पॉलिमर बॅटरी वापरली जाते. अशा बॅटरी वारंवार पूर्णपणे डिस्चार्ज केल्यास त्यांचं आयुष्य कमी होऊ शकतं.
मोबाईलची बॅटरी प्रत्येक वेळी १०० टक्के चार्ज करणं गरजेचं नाही. बॅटरी ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केली तरी सामान्य वापरासाठी ती पुरेशी ठरू शकते. मात्र दिवसभर बाहेर राहायचं असल्यास किंवा जास्त वापर अपेक्षित असल्यास १०० टक्के चार्ज करणंही योग्य आहे.
आधुनिक मोबाईलमध्ये बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर चार्जिंग नियंत्रित करणारी यंत्रणा असते. त्यामुळे रात्रभर चार्जिंगला ठेवल्याने लगेच बॅटरी खराब होते असं नाही. मात्र जास्त उष्णतेमुळे बॅटरीचं आयुष्य कमी होऊ शकतं, त्यामुळे मोबाईल उशीखाली किंवा जाड चादरीखाली ठेवून चार्ज करू नये.
मोबाईल चार्ज करताना शक्यतो कंपनीने दिलेला चार्जर आणि केबल वापरावी. चार्जिंगदरम्यान मोबाईल जास्त गरम होत असल्यास गेम खेळणं किंवा जड ॲप्स वापरणं टाळावं. खराब झालेली केबल, निकृष्ट चार्जर आणि उष्णता अडकून राहील अशा जागी चार्जिंग करणं टाळावं.
बॅटरीचं आयुष्य चांगलं ठेवण्यासाठी मोबाईलला जास्त गरम होण्यापासून वाचवणं महत्त्वाचं आहे. फोनमध्ये उपलब्ध असल्यास ऑप्टिमाइज्ड चार्जिंग किंवा बॅटरी प्रोटेक्शन हे फीचर सुरू ठेवावं. स्क्रीनचा प्रकाश गरजेनुसार ठेवणं आणि न वापरलेले ॲप्स बंद करणं यामुळेही चार्जिंग अधिक काळ टिकण्यास मदत होते.
मोबाईलची बॅटरी साधारण २० ते ३० टक्क्यांपर्यंत खाली आल्यावर चार्जिंगला लावणं योग्य असत. बॅटरीचं आयुष्य चांगलं ठेवण्यासाठी शक्यतो ती २० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची सवय लावावी.