Shreya Maskar
पावसाळा म्हटले की, चटपटीत आणि गरमागरम खाणे आले. पावसाळ्यात कुरकुरीत भाजी खाण्याची इच्छा प्रत्येकाला होते. पण पावसाळ्यात बाहेरचे भजी खाण्यापेक्षा घरीच अवघ्या १० मिनिटांत रेसिपी बनवा.
आपण आवडीने भजी खातो. मात्र बेसन, तेल यामुळे आपल्याला ॲसिडीटी होते, ज्यामुळे आपली तब्येत बिघडते. भजी बनवताना तुम्ही त्यात काही पदार्थ टाकल्यास ॲसिडीटीचा त्रास टळतो.
भजी बनवताना मिश्रणता चिमूटभर ओवा किंवा हिंग घाला. या मसाल्यांमध्ये 'थायमोल'सारखे सक्रिय घटक असतात, जे पचनसंस्थेतील विकरांना चालना देतात, गॅसची समस्या रोखतात आणि पोटातील आम्लतेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात.
ओव्याला आयुर्वेदात खूप मोठे महत्त्व आहे. ओव्याच्या सेवनाने पोट फुगणे, गॅस होणे आणि ॲसिड रिफ्लक्स (आम्लपित्त) यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
भजीच्या पिठात हिंग मिक्स करा. हिंग पचनास खूप मदत करते आणि बेसन तळल्यामुळे होणारा जडपणा किंवा गॅसचा त्रास टाळते.
कांदे आणि पिठात हलके कुटलेले जिरे किंवा जिऱ्याची पूड घातल्यास पोटातील आम्लतेचा त्रास कमी करण्यास मोठी मदत होते.
कांद्याचे भजी करत असाल तर कांदे चिरल्यानंतर त्यावर थोडे मीठ टाका आणि त्यातील जास्तीचे पाणी हाताने पिळून घ्या. यामुळे कांद्यातील कडवट आणि पचायला जड असणारा रस बाहेर पडतो.
भजी जास्त वेळ तेलात आणि जास्त तापमानावर तळू नका. कारण यामुळे ॲसिड रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो. भजीच्या पिठात चिमूटभर बेकिंग सोडा घातल्याने भजी अधिक हलकी, खुसखुशीत आणि पचायला सोपी होतात.