Shreya Maskar
मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेले कर्जत हे हिवाळ्यात भटकंतीसाठी उत्तम ठिकाण आहे. कर्जत परिसरात छोटे-मोठे डोंगर, हिरवीगार जंगलवाट, ऐतिहासिक किल्ले आणि सुंदर दऱ्याखोऱ्या पाहायला मिळतात.
कर्जतजवळील भिवगड हा कमी वेळेत करता येणाऱ्या ट्रेकसाठी ओळखला जातो. गौरकामथ गावाच्या परिसरातून या किल्ल्याच्या चढाईला सुरुवात करता येते. किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवर दगडी पायवाट, झाडी आणि नैसर्गिक खडकाळ रचना पाहायला मिळतात.
कर्जतजवळील सोंडाई किल्ला हा निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. मोरबे धरणाच्या परिसरातील सोनदेवाडी गावातून या किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात करता येते.
कर्जतपासून जवळ असलेला कोथळीगड म्हणजेच पेठचा किल्ला त्याच्या अनोख्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. पेठ गावाच्या वर उंच सुळक्यासारखा हा किल्ला दिसतो. किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे डोंगराच्या खडकात कोरलेला आतल्या बाजूचा जिना.
कर्जत परिसरातील तुलनेने कमी परिचित असलेल्या किल्ल्यांपैकी सोनगिरी हा एक पर्याय आहे. हा किल्ला जुन्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी असलेल्या टेहळणीच्या ठिकाणांपैकी एक मानला जातो.
राजमाची हा सह्याद्रीतील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. यामध्ये श्रीवर्धन आणि मनरंजन असे दोन बालेकिल्ले आहेत. कर्जतच्या बाजूने कोंदिवडे गावातून या किल्ल्याकडे जाणारी वाट चढणीची आहे. त्यामुळे हा ट्रेक करण्यासाठी चांगली शारीरिक क्षमता आवश्यक आहे.
नेरळ आणि माथेरानच्या डोंगररांगांच्या परिसरात असलेला पेब किल्ला म्हणजेच विकटगड हा ट्रेकर्ससाठी आकर्षणाचा विषय आहे. डोंगराच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी खडकाळ वाटा आणि काही ठिकाणी शिड्यांचा आधार घ्यावा लागतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.