Shreya Maskar
हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. संपूर्ण शरीराला रक्त आणि ऑक्सिजन पुरवण्याचे काम हृदय करते. मात्र, बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि वाढता ताण यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
नियमित चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि वजन संतुलित राहते. त्यामुळे दररोज वेगाने चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यांसारख्या शारीरिक हालचाली कराव्यात.
पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर आणि इतर हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून या भाज्या खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत होते.
आहारात जास्त मीठ खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबाचा परिणाम हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होतो. त्यामुळे चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स, लोणची, पापड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे अतिसेवन टाळावे.
झोपेचा अभाव हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब, वजन आणि रक्तातील साखरेचे संतुलन बिघडण्याचा धोका वाढू शकतो. प्रौढ व्यक्तींनी साधारणपणे दररोज ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करावा.
सततचा मानसिक ताण शरीरावर परिणाम करतो. तणावामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात. त्यामुळे रोज काही वेळ स्वतःसाठी काढा. ध्यान, योगासने, दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम आणि आवडते छंद यामुळे तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.
धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे टाळा, पुरेसे पाणी प्या, साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा, वजन नियंत्रणात ठेवा आणि रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल तपासत राहा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.